पिंपरी I झुंज न्यूज : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा झुम्बा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’ या झुंम्बा डान्स करत ठेका धरला. त्यांच्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे आणि अनेक नगरसेवकही डान्स करताना दिसतात.
राजकीय व्यक्ती अनेकदा अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमात ठेका धरताना दिसले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि समाजिक संस्थेच्या पुढाकाराने सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार महेश लांडगे या स्पर्धेच्यावेळी उपस्थिती होते. तेव्हा जमलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी महेश लांडगे यांनी चक्क झुम्बा डान्स केला.
“ रविवारी सकाळी भोसरी गावजत्रा मैदानावर रिव्हर सायक्लोथॉन स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी स्पर्धेनंतर पहिल्यांदा झुंबा व नंतर एका फिल्मच्या गाण्यावर नृत्य करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. महेश लांडगे यांनी केलेला नृत्यप्रकार फक्त मनोरंजन नव्हे तर झुम्बा डान्स हा एक शारिरीक व्यायाम म्हणून केला. सध्या त्यांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.