शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी बैठकीत दिली माहिती
पुणे I झुंज न्यूज : पुणे महापालिका हद्दीलगत असलेली २३ गावे पालिकेत घेताना न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून सदर प्रक्रिया राबविली जाईल. या गावांसह पूर्वी घेण्यात आलेल्या ११ गावांसाठीही निधीची तरतूद राज्य सरकारकडून केली जाईल. पुणे महापालिकेसाठी ठाकरे सरकार काही कमी पडू देणार नाही, असे अश्वासन देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज पालिकेत गाव समावेशाच्या प्रक्रियेवर शासकीय मोहर लावली, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
पुणे महानगरपलिकेत २३ गाव समावेश करण्याबाबतच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली असली तरी या गावांच्या विकासासाठी ९ हजार कोटी रुपयांची मागणी पालिकेकडून करण्यात आली आहे. गाव समावेशाची अधिसूचना जानेवारीत निघणार असताना निधीबाबतच्या या प्रश्नांवर संबंधीत गावांतील लोकप्रतिनिधींकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासह पुणे जिल्ह्यातील पीएमआरडी हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमणूक तसेच यशवंत सहकार साखर कारखाना सुरू करणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाणी शहर आयुक्तालयास जोडण्यास होणारा विरोध आदी प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज विशेष बैठक बोलावली होती.
या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई, वनमंत्री संजय राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवा सेना जिल्हा प्रमुख मच्छिंद्र सातव, अविनाश सातव, गजानन चिंचवडे, राजेंद्र काळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार न्यायालयीन बाबींची पूर्तता करूनच संबंधीत गावांचा समावेश पालिकेत करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत तसेच या गावांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही नगरविकास मंत्री शिंदे यांना सूचना करण्यात आल्या. याशिवाय पुणे शहराच्या पीएमआरडी हद्दीतील अडचणीची न ठरणार अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबतही सरकार अनुकुल असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हवेली तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याबाबतही निर्णय घेण्यात आला असून याची अमंलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत यशवंत कारखान्याला आर्थिक मदत करण्याची ठाकरे सरकारची भूमिका आहे. याबाबत कर्ज प्रकरणाशी संबंधीत बॅंकेचे अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधींबरोबर विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याबाबतची प्रक्रियेबाबतही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचना केल्याचे शिवसेना प्रमुख कटके यांनी सांगितले.
पोलीस ठाणी प्रश्नी लवकरच निर्णय : गृह राज्यमंत्री देसाई
राज्य सरकारच्या गृह विभागाने पुणे पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्यास परवानगी दिलेली असताना लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे शहर आयुक्तालयांतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, याबाबत लेखी आदेश नसल्याने या प्रक्रियेस विरोध होत असल्याची बाब गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या निदर्शनास शिवसेना जिल्हा प्रमुख कटके यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पुणे शहर तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांसंदर्भातील प्रश्नांवर पुण्यातच तातडीने बैठक घेणार असल्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांनी बैठकीत सांगितले.