पुणे I झुंज न्यूज : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या रविवारपासून चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि बार बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुणे शहरात २९ , ३० नोव्हेंबर तसेच १ आणि ३ डिसेंबरला ड्राय डे असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे बाबत आदेश दिले आहेत.
मतदानाच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २९ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर मद्याची दुकाने आणि बार बंद राहतील. तर १ डिसेंबरला मतदान असून सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर ती उघडतील. त्यानंतर ३ डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यादिवशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील दुकाने आणि बार बंद राहतील.
दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारमोहीम राबवल्या आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत यांदाच्या पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहे. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे. कारण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात १ डिसेंबरला राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक दोन दिवस आधी मतदान पॉझिटिव्ह आला तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. तसंच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.