मुंबई | झुंज न्यूज : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी दिली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचंही सदाभाऊ खोतांनी सांगितलं आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर सदाभाऊ खोतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावं सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवण्यात आली आहेत. सदाभाऊ खोतांनी राज्यपालांची भेट घेऊन ही नावं सुचवल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
तसेच त्यांनी राज्यपालांकडे इतरही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत करावी, अशा आशयाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री आम्ही आंदोलन केलं तर कोविडचं कारण दाखवून त्यावर नाराजी व्यक्त करतात. पंतप्रधानांकडे तक्रार करतात. पण आम्ही झपाटलेला या सिनेमातला बाहुला पाहिलाय. त्याच बाहुल्यासारखं मुख्यमंत्री सारखा सारखा कोरोनाचा बाहुला पुढे करतात, असा टोलाही सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.
दुसरीकडे राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांकडे १५ दिवसांच्या मुदतीची शिफारस करण्यात आली होती. राज्यपालांकडे नावं देतानाच ठाकरे सरकारकडून मुदतीची शिफारस मागण्यात आलेली होती. अद्याप राज्यपालांकडून निर्णयासंबंधी कोणत्याही हालचाली नाहीत.