मुंबई | झुंज न्यूज : मिर्झापूर वेब सीरिजमुळे अभिनेते पंकज त्रिपाठी घराघरांत पोचले. आलेलं काम चोख केल्यामुळे पंकज त्रिपाठी यांचा आपला असा वर्ग तयार झाला आहे. खूप उशीरा येऊनही पंकज यांनी काम सुरू केलं. आलेल्या प्रत्येक भूमिका त्यांनी घेतल्या. कारण त्यांना या इंडस्ट्रीत स्थिर व्हायचं होतं. आता मात्र नाव आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर पंकज यांनी जरा सबुरीनं घ्यायचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळेच हे शक्य झाल्याचं ते सांगतात.
मिर्झापूर २ ही वेबसीरिज खूपच हिट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकज म्हणातात, ‘लॉकडाऊन आधी मी मला येईल त्या भूमिका स्वीकारत होतो. अर्थात मी केलेली भूमिका गाजल्यानंतर मला पुढची भूमिका यायची. मी माझं मानधनही वाढवलं. तरी भूमिका येत होत्या. एकदा एक छाप लोकांना आवडली की तशाच भूमिका तुमच्याकडे येतात. तरी मी वेगळ्या भूमिकाही केल्या. गुंजन सक्सेनामध्ये मी बापाची भूमिका साकारली. वकिलाचीही भूमिका माझ्याकडे आली होती. तीही केली. पण पुढे लॉकडाऊन आला. आणि सगळंच काम थांबलं. यावेळी मला थोडा वेळ मिळाला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी खूप काम हातात घेतलं आहे. मी वर्कोहोलिकच झालो होतो. पण आता मला वेळ मिळाला आहे. त्यानंतर मी जरा सबुरीने घ्यायच ठरवलं.’
पंकज त्रिपाठी यांना येणारी कामं पाहता ते गुंड किंवा राजकारणी असल्याचं दाखवलं जातं. पण आता मात्र पुढच्या वर्षी ते अशा भूमिकांना फाटा देणार आहेत. ते म्हणतात, ‘अनलॉक झाल्यानंतर काम सुरू झालं आहे. पण मी अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. पुढच्याच वर्षी मी काम सुरु करेन. पण त्यातही मी आता काही निवडक कामं करायची ठरवली आहेत. यात एक नक्की की मी गॅंगस्टर होणार नाही. निदान २०२१ मध्ये मी अशा भूमिका स्वीकारणार नाही. त्यानंतर कशा भूमिका येतात ते बघू. शिवाय माझे तीन चित्रपट येणार आहे. यात ८३, मिमी, कागज या चित्रपटांचा समावेश होतो.’
गेल्या काही महिन्यांपासून वेबसीरिजने एक नवा चेहरा लोकांसमोर आणला तो होता पंकज त्रिपाठी. पंकज यांनी खूप मेहनतीने आपलं करिअर घडवलं. अनेकांना माहित नसेल, पंकज त्रिपाठी यांनी आपलं काम करताना सातत्याने आपलं मानधन वेगवेगळं ठेवलं, वाढवलं. लोकांनीही ते देऊ केलं कारण, पंकज त्रिपाठी कामही तसंच करत होते. आता मात्र पंकज यांनी निवडक काम करायचं ठरवलं आहे.