नाशिक | झुंज न्यूज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना नाशिक येथील पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा छगन भुजबळ यांनी राज्यपालांना काळजी न करण्याचा सल्ला दिला. नियमानुसार अर्णव गोस्वामी यांची सर्व काळजी घेतली जाईल. परंतु, राज्यपाल छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याची मिष्किल टिप्पणी यावेळी भुजबळ यांनी केली.
अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भाजप नेते त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी केला.
त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णव गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.