धुळे | झुंज न्यूज : भाजपमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यापूर्वी धुळ्यातील नेते अनिल गोटे यांनीही भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता हे दोन्ही नेते मिळून उत्तर महाराष्ट्रात काय राजकीय बदल घडवून आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
“एकनाथ खडसे यांनी वैयक्तिक कारणामुळे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे भाजपश्रेष्ठींना कळवले होते. यानंतर शुक्रवारी मुंबईत खडसेंचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला. दसऱ्यापूर्वीच एकनाथ खडसे यांचे सीमोल्लंघन झाले. एकनाथ खडसे यांच्याआधीच धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या अनिल गोटे यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपद असून त्यांनीही एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या ताब्यात असलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.”
सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सध्या माझ्या संपर्कात भाजपचे १६ नगरसेवक आहेत आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत सध्या तरी काहीच हालचाली आम्ही करणार नाही. आदेश आला की २४ तासात चमत्कार दिसेल, असे गोटे यांनी सांगितलं
अनिल गोटे यांचे परिपत्रक
एकनाथ खडसे आणि अनिल गोटे यांच्या एकत्रित येण्याने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे हात बळकट होण्यास मदत होणार आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी नुकत्याच काढलेल्या एका पत्रकात भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या हे पत्रक देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते कितपत प्रतिसाद देतात हे औत्सुकत्याचे आहे.