पिंपरी | झुंज न्यूज : नुकत्याच सात्सूर (माकणी), उस्मानाबाद येथील दहा वर्षीय चिमुरडीवर चार नराधमांनी सामूहिक रित्या बलात्कार करून अत्यंत अमानुष अत्याचार केला. त्या नराधमांनवर कारवाई करा आणि पिडीत बालिकेस न्याय मिळवून द्यावा यासाठी ओबीसी संघर्ष सेनेकडून पिंपरी चिंचवड तहसिलदार द्वारे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हणले आहे की, लातूर येथील सिव्हिल रुग्णालयात अत्याचार झालेल्या चिमुरडीवर गंभीर अवस्थेत उपचार चालू आहेत. पिडीत मुलीचे वडील सास्तुर येथे सालगडी असून आई मजुरी करते. पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मुलीच्या औषधोपचारासाठी कुटुंब संघर्ष करीत आहे. त्यांची कोणीही दखल घेत नसून उलट त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे पिडीत निर्भया व तिचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. त्यांना शासनाकडून पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नाही.
या प्रकरणात एफआयआर नोंद होऊन सुद्धा नराधमांना अटक झाली नाही. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अशा घटना शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. सदर प्रकरणात आपण व्यक्तीश: लक्ष घालून पीडित कुटुंबीयाला न्याय मिळवुन द्यावा व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी पुणे जिल्हा प्रभारी सुरेश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष वैजनाथ शिरसाट, गणेश वाळुंजकर, लहुजी आनारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.