मविआ उमेदवार राहुल कलाटे यांचे निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर
चिंचवड । झुंज न्यूज : चिंचवडमध्ये मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी ‘सजग रहो’ असे शर्ट घालून बूथ लावून एसपीजे फाउंडेशन संस्थेमार्फत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. गुड समरिटन स्कुल, वाकड गावठाण, विकासनगर, किवळे अशा अनेक भागात या संस्थेमार्फत बूथ उभारण्यात आलेले आहेत. मात्र ही रचना भाजप उमेदवाराचा थेट प्रचार करणारी असून, अशाप्रकारे हे आदर्श संहिता आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे, अशी लेखी तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सजग नागरी मंचकडून अनेक ठिकाणी बूथ उभारण्यात आलेले आहेत. या बुथवर लावलेला QR कोड स्कॅन केल्यावर ते भाजप उमेदवार शंकर जगताप यांचा फोटोअसलेल्या एसपीजे फाउंडेशन अशा संकेतस्थळावर निर्देशित केला जातोय. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. याबद्दलचे पुरावेही कलाटे यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला मेल केले आहे. शिवाय यावर आक्षेप घेऊन आम्ही तक्रार केल्यानंतर विरोधी उमेदवारांकडून फेक व्हिडीओ व्हायरल करत कांगावा करण्यात आला, असे कलाटे यांच्या निवडणूक प्रतिनिधींचे म्हणणे आहे. निवडणूक आयोग याची दखल घेऊन कारवाई करेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चिंचवडमध्ये मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी ‘सजग रहो’ असे शर्ट घालून बूथ लावून मतदान करण्याचे आवाहन करणारे बूथ लावण्यात आलेले होते. त्या बुथवर असलेले क्युआर कोड प्रत्यक्ष स्कॅन करून बघितल्यावर लक्षात आले की हे क्युआर कोड स्कॅन केल्यावर भाजप उमेदवाराचा फोटो असलेल्या संस्थेच्या संकेतस्थळाची लिंक खुली होते. मतदानादरम्यान अशा प्रद्धतीने थेट प्रचार करणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. मेलवर त्यांना पुरावेही सादर केलेले आहेत.– राहुल कलाटे