गडकरींना राहुल कलाटे यांचे भावनिक पत्र !
वाकड I झुंज न्यूज : चिंचवड विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी (ता.16) सायंकाळी वाकड येथे येणार आहेत. याचेच औचित्य साधून आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी गडकरी यांना भावानिक पत्र लिहिले आहे. यामध्ये, मतदार संघातील प्रलंबित समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधून जरा, यावर एकदा बोलाच असे भावानिक आवाहन कलाटे यांनी केले आहे. हे पत्र गडकरींच्या सभेपूर्वी शहरात दिवसभर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
दरम्यान, वाकड -पुनावळेपासून रावेत किवळ्यापर्यंतच्या हायवेलगतच्या रस्त्याने किंवा सेवा रस्त्याने प्रवास करतांना आमच्यापैकी अनेकांना दररोज आपली आठवण येत असते. याठिकाणी खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे अशी केवीलवाणी अवस्था झाली आहे. ऐन पावसाळ्यात तर, रस्त्यांची भीषण अवस्था असते. याबद्दल मी हक्काने आपल्याला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. आज आपण शहरात येत असल्याचे समजल्याने आपणास पुन्हा पत्र लिहीत आहे. कारण आपला हा संवाद जुनाच आहे. साधारणपणे २०१८ साली पहिल्यांदा याबद्दल आपल्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली.
तेव्हाही सेवा रस्त्याची परिस्थिती अशीच होती. आपण तातडीने दखल घेत डागडुजीच्या सूचना देखील दिल्या. मात्र, २०१८ पासून ते आता २०२४ पर्यंत सातत्याने मी आपल्याला पत्र लिहून वाकड ताथवडे- पुनावळे – रावेत – किवळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी, चौपदरी नवीन सब वे बनविण्यासाठी, नवीन सेवा रस्त्यांसाठी, वाकड ते किवळे सेवा रस्ता दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तसेच वाकड ते किवळे एलेव्हेटेड कॉरिडॉरसाठी सातत्याने पत्रव्यवहार करत आहे. मात्र, त्यास मुहूर्त मिळत नसल्याने एकदा आपण यावर बोलाच अशी भावानिक साद राहुल कलाटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे घातली आहे.
“महामार्ग आणी सेवा रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. त्यावर, आजतगायत फक्त चालढकल करण्यात येत आहे. हीच परिस्थिती आमच्या भागातल्या पाण्याची आहे. टँकर मुक्त चिंचवड केवळ दिवास्वप्नच बनून उरले आहे. एकेकाळी चिंचवडचे वैभव असणाऱ्या नद्यांना सुद्धा प्रदूषणाने ग्रासले आहे. गडकरी साहेब आपली ओळख स्पष्टवक्ता अशीच आहे. त्यामुळे, आता बोलाच, जुन्या आश्वासनां ऐवजी तुम्ही आम्हाला बदलाचा मार्ग नक्की दाखवाल, अशी अपेक्षा आहे.
– राहुल कलाटे
उमेदवार, महाविकास आघाडी चिंचवड