शिरूर I झुंज न्यूज : परतीच्या वळवाच्या वादळी पावसाने सर्वत्र थैमान मांडले असून कोरेगाव भीमा, लोणीकंद, शिक्रापूर या परिसरात खूप नुकसान झाले आहे. ओढे-नाले तुडुंब भरून वाहिले, कित्येक ठिकाणी रस्ते बंद झाले तर रस्ते वाहून गेले, शिक्रापूर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः कार पुराच्या पाण्यात वाहून जाताना दोघांना वाचविण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले. जीव वाचलेल्या दोघांसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस जणू देवदूत बनले होते . पोलिसांच्या या धाडसी कामगिरीबद्दल शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
“दोन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शिक्रापूर येथील ओरा सिटी लगतच्या ओढ्याला मोठा पूर आला प्रवास करणारी एम एच १४ व्ही आर ४६४४ ही स्विफ्ट कार वाहून गेली व पुराच्या मध्यभागी झाडाला अडकली गाडीमधील लोकांनी आरडाओरडा केल्याने रस्त्यावरील नागरिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनची संपर्क साधला. तातडीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस हवालदार लक्ष्मण शिरस्कर, होमगार्ड मनोहर पुंडे, योगेश बदे, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस हवालदार संजय धमाळ, होमगार्ड मनोहर पुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता ओढ्याच्या पाण्यात उडी मारली आणि दोराच्या सहाय्याने अडकलेल्या दोघांची सुटका केली. अनुकुमार विश्वनाथ जाधव व निसार करीम शेख दोघेही राहणार शिक्रापूर यांना नवीन जीवदान शिक्रापूर पोलिसांमुळे मिळाले आहे.”
शिक्रापूर पोलिसांच्या धाडशी कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. त्याबद्दल शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेनेचे उपतालुकाप्रमुख आनंदराव हजारे, रोहिदास शिवले, दत्ताभाऊ गिलबिले, दिलीप कोठावळे, बाळासाहेब दाते, कुमार सासवडे, राजाभाऊ काठमोरे उपस्थित होते.