जागृत नागरिक महासंघाची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : मनपा सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याची देणी मिळणे व पेन्शन चालू होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे तथापि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सेवा पुस्तक लेखा परीक्षणासाठी उशिरा जाते व त्यातील त्रुटींची पूर्ततासाठी विविध विभागांना चक्रा मारताना कर्मचाऱ्याची अक्षरश: ससेहोलपट होते.
30-35 वर्ष प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेळी ससेहोलपट होऊ नये म्हणून त्यांचे सेवापुस्तक लेखापरीक्षण 18 महिने अगोदर व्हावे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी काही वर्षे वाट पाहावी लागते त्यांची चौकशी करून त्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जागृत नागरिक महासंघाने मा आयुक्तांकडे केलेली आहे .
महासंघ अध्यक्ष नितीन यादव उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा व पिं चिं शहर प्रमुख अशोक कोकणे यांच्या उपस्थितीत मनपा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी निवेदन स्विकारून याचा निश्चित विचार करू असे आश्वासन महासंघाला दिले आहे.