पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणा-या, समाजामधल्या प्रत्येक घटकाला व्यक्त होण्याची संधी देणा-या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या खजिनदार व अभिनेत्री शुभांगी दामले, गायिका व अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे संचालक श्रीदत्त गायकवाड आदि उपस्थित होते.
रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले- कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रम अधिकारी विराज सवाई व निर्मिती सहाय्यक विद्या राणे यांनी रेडिओच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. मागील दोन वर्षांमध्ये ७० नैमित्तिक कार्यक्रम, विविध विषयांच्या तब्बल ५० मालिका, ४० तज्ञांच्या मुलाखती, ५० सामाजिक संस्थांबरोबर संवाद, भारताच्या गौरव गीतांची ५२ आठवड्यांची मालिका आणि ७० ‘लाईव्ह शो’ रेडिओवरून प्रसारित झाले आहेत. या निर्मितींमध्ये पिंपरी चिंचवडकरांबरोबरच पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, चिपळूण येथील नागरिकांचा सहभाग होता. या मालिकांची निर्मिती करणाऱ्या तज्ञांना सन्मानित करण्यात आले.
स्फूर्ती कुलकर्णी हिच्या शिवस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वा करंदीकर आणि प्राची करंदीकर-घारपुरे यांनी गदिमांची गाणी तर चेतन पंडित यांनी नाट्य प्रवेश सादर केला. अशोक अडावतकर यांनी सांगितलेले रसिकतेचे किस्से, अपर्णा डोळे यांच्या कविता, अंजली क-हाडकर आणि आर्या परांजपे यांनी सादर केलेले संगीत नाटुकलं, आरंभी रिठे हिने सादर केलेले गणपती गीत, चांदणी पांडे आणि सहगायिकांनी सादर केलेली हिंदी गाण्यांची सुरेल शृंखला, प्रकाश निर्मळ यांची नर्मविनोदी कथा या दर्जेदार सादरीकरणांनी सर्व रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. चैतन्य काजुळकर या युवा शाहिराने सादर केलेल्या महाराष्ट्र पोवाड्याने सोहळ्याची सांगता झाली.
अस्मिता चिंचाळकर ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ हे नाट्यपद गायले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले. पीसीसीओई आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजनामध्ये सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तांनी कलाकारांचं कौतुक केलं. इन्फिनिटी रेडिओच्या दोन वर्षांच्या प्रवासाचे, कार्यक्रमांचे तसेच टीमचे कौतुक केले शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.