‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्या प्रेयसीचा खून
थेरगाव I झुंज न्यूज : गणेशोत्सवाच्या धामधुमीत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसात दुसरी खुनाची घटना घडली. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह रिक्षामध्ये ठेवून रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभी करून प्रियकर पसार झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. ११) सकाळी काळेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आला.
शिवानी सोमनाथ सुपेकर (वय २७, रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. प्रियकर विनायक आवळे हा पसार आहे. शिवानी हिच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले आहे. शिवानीची आई काळेवाडी स्मशानभुमीजवळ राहाते. तर, संशयित आरोपी आवळे हा विवाहित असून तो पिंपरीत वास्त्व्यास आहे. त्याला २० वर्षाचा एक मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांपासून विनायक आणि शिवानी हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते.
मंगळवारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून विनायक या मध्यरात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान शिवानीचा गळा आवळून खून केला. शिवानीचा मृतदेह रिक्षात ठेवून त्यावर चादर टाकली. त्यानंतर रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर पार्क केली. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे, वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी रिक्षा क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. त्याने ती रिक्षा आवळे याला भाड्याने दिल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
पेविंग ब्लॉकने मारून व्यक्तीचा खून
थेरगाव I झुंज न्यूज : पेविंग ब्लॉकने मारून व्यक्तीचा खून केल्याची घटना सोमवारी (दि. 9) सकाळी धनगर बाबा मंदिरा जवळ थेरगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अली अन्सारी (वय 35) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी श्वेता घोरपडे/ शिंदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक बीआरटी रोड धनगर बाबा मंदिरा जवळ सोमवारी सकाळी अली अन्सारी याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पेवींग ब्लॉकने मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.