बचत गटाच्या महिलांनी आर्थिक साक्षर होणे गरजेचे – प्राचार्य संजय खरात
चाकण I झुंज न्यूज : “आर्थिक फसवणुकीची प्रकरणे वाढत असल्याने मोबाईलचा योग्य वापर करून बचत गटाच्या महिलांनी आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य संजय खरात यांनी केले.
डीईए फंड आरबीआय मुंबई, फ्युचर बँकर्स फोरम ऑफ कॉमर्स फॅकल्टीमार्फत डीईए फंडाच्या अंतर्गत खराबवाडी ( ता. खेड ) येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे, संतभारती ग्रंथालय नाणेकरवाडी आणि क्रांती महिला बचत गट खराबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील महिला बचत गटाच्या महिलांसाठी ‘ठेवीदारांचे शिक्षण आणि जागृती कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या एक दिवशीय कार्यशाळेत बचत गटाच्या महिलांना बँकिंग आर्थिक साक्षरतेचे धडे गिरवून शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य संजय खरात यांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल संतभारती ग्रंथालयाच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
तसेच संतभारती ग्रंथालयाचे रौप्य महोत्त्सवी वर्षानिमित्त व क्रांती महिला बचत गटाला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गावातील २१ बचत गटांना ज्ञानेश्वरी ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन ‘उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच अष्टविनायक महिला बचत गटाच्या सदस्यांना १ लाख ४१ हजार व क्रांती बचत गटाच्या सदस्यांना प्रत्येकी ६६ हजार रुपयांचा धनादेश बचत व लाभांश म्हणून देण्यात आले.
रिझर्व्ह बँकेचे अधिकारी भूषण पाडोळे यांनी डीईए फंड, प्रधानमंत्री जीवनज्योती आणि सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना, सुकन्या योजना, लघुउद्योगासाठी कर्ज, जन-धन बचत खाते अशा अनेक योजनांची माहिती दिली.
“महिला सबलीकरण यशस्वी करायचे असेल तर महिलांना आर्थिक साक्षर करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राजगुरूनगर सहकारी बँकेचे महाळुंगे शाखा व्यवस्थापक नाथाराम नाणेकर यांनी केले. नाणेकर यांनी महिलांना बचतीचे महत्व, बँकेतील खाती, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, फसव्या लिंक, ओटीपी, एटीएम, पासवर्ड आदी डिजिटल बँकिंगची सखोल माहिती दिली.
तसेच पुणे पिपल्स को ऑपरेटिव्ह बँकेचे ओएसडी विजय देवधर यांनी बचत, सबसिडी, नफा, ब्रॅण्डिंग, शासनाच्या विविध योजनांची सखोल माहिती दिली.
यावेळी येलवाडी येथील जागृती महिला बचत गटाच्या अध्यक्षा रोहिणीताई गाडे यांनी गटाच्या माध्यमातून वेफर्स, कुरकुरे आदी वस्तूंचे उत्पादन केल्याबद्दल त्यांचा मेडल व ज्ञानेश्वरी ग्रंथभेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
संतभारती ग्रंथालयाचे अध्यक्ष हनुमंत देवकर व बचत गटाच्या अध्यक्षा मंगलताई देवकर यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांना सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी बैंक मित्र स्वयंसेवकांनी ऑनलाईन बँकिंग सुरक्षितता, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा व जीवनज्योती विमा आदी शासनाच्या योजना पथनाट्याद्वारे सादर करून जनजागृती केली. तसेच बँकिंग साक्षरतेचे पोस्टर्स आवारात लावून जनजागरण केले.
डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी महिलांना आर्थिक साक्षरतेची शपथ दिली. विजयालक्ष्मी कुलकर्णी व कीर्तनकार हभप. पारुताई कड यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांना ज्ञानेश्वरी व स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला.
* उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार प्राप्त गट पुढीलप्रमाणे :- अष्टविनायक, तिरुपती, वाघजाईमाता, ज्ञानदीप, सावित्रीबाई फुले, राजरत्न, सरस्वती, भिमाई, महालक्ष्मी, दीक्षाभूमी, संघर्ष, तुळजाभवानी, सावली, राजमाता, सिद्धिविनायक, जय हनुमान, धनलक्ष्मी, गौरीशंकर, सुवासिनी, जय माता, वाघजाईमाता स्वयंसहाय्य महिला बचत गट.
यावेळी डॉ. पल्लवी निखारे, अरुणा कंटक, महिला अत्याचार तक्रार समितीच्या केंद्रीय सदस्या व क्रांती महिला गटाच्या अध्यक्षा मंगलताई देवकर, महिला ग्रामसिद्ध संघाच्या अध्यक्षा कविता म्हस्के, क्रांती गटाच्या सचिव संगीता केसवड, महिला दक्षता समिती सदस्या सुनंदा शिंदे, माजी ग्रा. पं. सदस्या सिंधू गजशिव, भारती कड, अनिता कड, अर्चना बिरदवडे, अनिता धाडगे, निर्मला खराबी, रेखा धाडगे, मंदा कड, अर्चना खराबी, छाया शिळवणे, कविता शिळवणे, जया बिरदवडे, सुरेखा कड, शैला साठे आदी उपस्थित होते. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.