पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कार्यकाळात झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सीआयडी किंवा ईडी मार्फत करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच आयुक्तालयातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अॅड. चाबुकस्वार म्हणाले, खंडणी दरोडा पथकाचे पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून पोलीस आयुक्तालयातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली आहे. लोखंडे यांनी पत्रात अनेक गंभीर आरोप केले असून पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींसह आदींचा उल्लेख केला आहे. या सर्वांची चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी तळेगावात १०० एकर जागा खरेदी केल्याचा दावा पत्रात केला आहे. खंडणी व दरोडा पथकाच्या प्रमुख पदी सुधीर अस्पत यांची नियुक्तीनंतर नितीन लोखंडे आणि पोलीस हवालदार खांडे यांच्या मार्फत अस्पत भ्रष्टाचाराच्या पैशाची वसुली करत होते. तसा कबुली जबाब पत्रामध्ये आहे. यासह विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पत्रात उल्लेख आहे. अस्पत यांनी पद्मनाभन यांना हनीट्रॅपमध्ये अडकविल्याचेही या पत्रात म्हटले आहे. या हनी कोण कोणत्या आहेत व कुठे राहातात? या सर्व प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून पद्मनाभन आणि अस्पत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चाबुकस्वार यांनी केली आहे.
“पिंपरी कॅम्पमधील आसवानी बंधूंकडे सुधीर अस्पत याने भ्रष्टाचाराने कमविलेले तब्बल २० कोटी रुपये व्हाईट करून घेतले असल्याचा पत्रात उल्लेख असून याचीही चौकशी करण्याची मागणी चाबुकस्वार यांनी केली आहे. तर सुधीर अस्पत यांना तात्काळ त्यांच्या पदावरून निलंबित करावे, अशी मागणीही चाबुकस्वार यांनी केली आहे.”
आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मागण्या
१) पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी १०० एकर जागा सुधीर अस्पत यांच्या मदतीने तळेगाव येथे खरेदी केली आहे, असे पत्रामध्ये नमुद आहे, त्याची चौकशी सीआयडीमार्फत करून F.I.R. दाखल करावा.
२) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर खंडणी व दरोडा पथकाच्या प्रमुख पदी सुधीर अस्पत यांची नियुक्ती केली. नितीन लोखंडे आणि पोलीस हवालदार खांडे यांच्या मार्फत सुधीर अस्पत भ्रष्टाचाराच्या पैशाची वसुली करत होते. तसा कबुली जबाब पत्रामध्ये आहे. म्हणून याची सीआयडीमार्फत चौकशी करून सुधीर अस्पत यांच्यावर F.I.R. दाखल करण्यात यावा.
३) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खंडणी/दरोडा विषयक दोन कार्यालये का आहेत, याची चौकशी करून कासारवाडीतील कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराचा काळा पैसा जमा केला जात आहे. असा कबुली जबाब नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी दिला आहे. त्याची चौकशी सीआयडीमार्फत करावी तसेच कासारवाडीचे दुसरे खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे कार्यालय ताबडतोब बंद करण्यात यावे.
४) नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी या पत्रात कबुली जबाब दिला आहे की, लोखंडे हे स्वत: आणि हवालदार खांडे हे दर महिन्याला सुधीर अस्पत यांच्या सांगण्यावरून दरमहा ४ कोटी रूपये जमा करून सुधीर अस्पत यांना देतात. हे पैसे कोणाकडून कलेक्ट करायचे. यामध्ये अवैध धंदे, जमीनीचा ताबा मारणे अशा स्वरूपाची गुन्हेगारी स्वरूपाची कामे सुधीर अस्पत यांचेमार्फत केली जात. ४ कोटी पैकी फक्त ५० लाख रूपये पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना द्यायचे. बाकीच्या साडेतीन कोटी रूपयांचे काय करायचे व कुणाला देत होते, याची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी, पद्मनाभन आणि सुधीर अस्पत यांचेवर F.I.R. नोंदविण्यात यावा.
५) सुधीर अस्पत यांनी पद्मनाभन यांना हनीट्रॅपमध्ये अडकविले होते. या हनी कोण कोणत्या आहेत व कुठे राहातात याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी.
६) पद्मनाभन यांचे भ्रष्टाचाराचे २० कोटी रूपये श्रीचंद आसवानी यांनी White करून दिले. ते कसे काय केले म्हणून श्रीचंद आसवानी यांची इडीमार्फत चौकशी करून त्यांचेवर आणि पद्मनाभन साहेबांवर F.I.R. दाखल करावा.
७) श्रीचंद आसवानी हे पिंपरी कॅम्पमधील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सुधीर अस्पत यांचे भ्रष्टाचाराने कमविलेले किती पैसे गुंतविले आहेत. तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांचे किती पैसे गुंतविले आहेत, याची चौकशी इडीमार्फत करून श्रीचंद आसवानी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
८) नितीन लोखंडे आपल्या कबुली जबाबात सांगतात, सुधीर अस्पत यांचे विश्रांतवाडी येथे हॉटेलचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम कोणाच्या नावावर आहे? व किती रूपये खर्च केले आहेत ? आणि पैसे कुठुन आले याची सीआयडीमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा.
९) नितीन लोखंडे आपल्या कबुली जबाबात लिहितात, पठाण नावाचे पोलीस कर्मचारी बदलून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेले आहेत, ते देखील भ्रष्टाचाराच्या पैशाची वसुली करतात. त्यांची देखील चौकशी करावी, व गुन्हा दाखल करावा.
१०) नितीन लोखंडे आपल्या कबुली जबाबात लिहितात, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना सुधीर अस्पत यांनी मॅनेज केले आहे. हे मॅनेज करणे म्हणजे काय याची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी.
११) नितीन बाळासाहेब लोखंडे आणि महेश दत्तात्रय खांडे हे दोघे ही पोलीस आयुक्तालयात खंडणी/दरोडा विरोधी पथकामध्ये कर्मचारी आहेत. त्यांचा कबुली जबाब महत्त्वाचा आहे. त्यांनी केलेले आरोप सार्वजनिक झालेले आहेत. त्यांच्या दोघांच्या पत्नींचे नावे लेबर कॉन्ट्रक्ट लायसन्स काढले आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, या कॉन्ट्रक्टचे खरे मालक सुधीर अस्प्त आहेत. असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून लोखंडे आणि खांडे यांचा कबुली जबाब सीआयडीमार्फत नोंदवावा, व त्याची चौकशी करावी.