– संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ युवासेनेचे सैनिक मैदानात
पिंपरी I झुंज न्यूज : स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांची, तसेच अशा गद्दारांना धडा शिकवणारी ही लोकसभा निवडणूक आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वांपर्यंत मशाल पोहोचवा, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शहरप्रमुख चेतन (अण्णा) पवार यांनी युवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील पक्ष कार्यालयात आयोजित युवासेनेच्या आढावा बैठकीत चेतन पवार बोलत होते. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपशहर प्रमुख भाऊसाहेब जाधव, विनायक दळवी, निखील दळवी, सुमित निकाळजे, रोहन वाघेरे, गणेश जोशी, पिंपरी विधानसभा युवाप्रमुख शुभम मुळे, चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा मीडिया प्रमुख अदिराज कमोट पदाधिकारी, युवा सैनिक या वेळी उपस्थित होते.
चेतन पवार पुढे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होत होत होते. तळेगावला उद्योग आल्यामुळे रोजगार निर्मिती होणार होती. परंतु गद्दारांमुळे आलेल्या सरकारने आणि त्यांच्या महाशक्तीने युवकांचे रोजगार पळवले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे देखील यामुळे नुकसान झाले. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई हे मुद्दे घेऊन युवासेना लोकांपर्यंत जात आहे. लोकांमध्ये असंतोष असून तेच गद्दारांना धडा शिकविणार आहेत.
“मशाल सर्वांपर्यंत पोहचवू अन् त्यांचा डाव हाणून पाडू”
मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठविण्याचा मानस केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात जनजागृती करून मतांची टक्केवारी वाढवावी लागेल. मात्र, चिन्हावरून दिशाभूल करुन मते मिळविण्याचा डाव विरोधकांचा दिसतो आहे. तो आपण मतदारसंघात घरा घरात उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश आणि “मशाल” चिन्ह पोहचवून हाणून पाडू, असेही चेतन पवार यांनी म्हटले.