वाकड I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सध्या पावसाळा पूर्व कामांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर वाकड आणि परिसरातील काळाखडक, विनोदे वस्ती, भूमकर वस्ती, पारखे वस्ती, कस्पटे वस्ती भागातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने हाती घ्यावीत. पावसाळ्यात पाणी साठू नये अथवा तुंबू नये, यासाठी ओढे, नालेसफाई, ड्रेनेजलाइनची साफसफाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपाच्या ड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागास निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आगामी काही दिवसात पावसास सुरूवात होत आहे. महापालिकेने दरवर्षी प्रमाणे वाकड आणि परिसरातील काळाखडक, विनोदे वस्ती, भूमकर वस्ती, पारखे वस्ती, कस्पटे वस्ती या भागातील नालेसफाई, ड्रेनेजलाईनची योग्य पद्धतीने साफसफाई करावी. जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबून राहून वाहतूक कोंडी अथवा नागरिकांची गैरसोय होणार नाही.
या भागातील काही ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असल्याच्या यापूर्वी काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचत आहे, अशा ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात. ड्रेनेज लाईन साफ करून घ्याव्यात तसेच नैसर्गिक ओढ्यांची सफाई करून घेण्यात यावी. मेच्या दुसऱ्या टप्प्यात मान्सूनपूर्व पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये. खासकरून नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावी लागतात. अन्यथा नाल्यातील अडथळे व जमलेल्या कचऱ्यामुळे पहिल्याच पावसात ते तुंबण्याची भीती असते. त्यामुळे बिकट परिस्थिती उदभवू शकते.
महानगरपालिका, कार्यक्षेत्रातील मलनिःसारण, सांडपाणी व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वीची इतर सर्व कामे पाणीपुरवठा, स्वच्छतेची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत असेही विशाल वाकडकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.