पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र शाहीर परिषद व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा बालशाहीर पुरस्कार व महिला शाहिर पुरस्कार सोहळा नुकताच पिंपरी येथे संपन्न झाला.
यावेळी शाहीर नमन कांबळे, बालशाहीर पुष्पराज ननावरे, बालशाहीर कु.आशलेषा पडवेकर, महिला शाहीर प्रेयेसी गुरूराज कुंभार व वादक विशेष पुरस्कार वैभव गोरखे (संबळ) यांना उद्योजक दीनानाथ जोशी यांच्या हस्ते देत गौरविण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषदचे अध्यक्ष शाहिर प्रकाशदादा ढवळे, संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदु कदम, संजीवनी महिला शाहिरी पथकच्या अध्यक्ष वनिता मोहिते, उद्योजीका वंदना जोशी, हरीभाऊ कळमकर, रजनी आहेर हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पुरस्कार प्राप्त झालेल्या बाल शाहीर चि. नमन कांबळे याने बाजीप्रभु देशपांडे, चि. पुष्पराज ननावरे याने सावित्री बाई फुले, कु. आश्लेषा पडवेकर हिने महाराष्ट्रचा पोवाडा व सौ. प्रेयेसी गुरुराज कुंभार यांनी राजमाता जिजाऊ यांचा पोवाडा सादर करून रसिकांची दाद मिळवली. वादक विशेष पुरस्कार मिळालेला चि. वैभव गोरखे यांनी संबळ वादन करून सर्वांची मन जिंकली या सर्वांना ढोलकी साठी श्री. उद्धव गुरव व हार्मोनियम साठी शाहिर नेटके यांनी साथ केली.
श्री. दीनानाथ जोशी व श्री. नंदु कदम यांनी आपल्या मनोगतामधून सर्व पुरस्कार प्राप्त शाहिरांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाहिर प्रकशदादा ढवळे यांनी प्रास्ताविक केले, सौ. कीर्ती मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ. वनिता मोहिते यांनी केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे संयोजन संजीवनी महिला शाहिरी पथक त्यामध्ये शाहिर प्रचिती भिषणूरकर, शाहीर चित्रा कुलकर्णी, शाहीर लीना देशपांडे, शाहिर स्मिता बांदिवडेकर, शाहीर कांचन जोशी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.