चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी
पिंपरी I झुंज न्यूज : महाशिवरात्रीला सिंहगडावरील तानाजी कड्याजवळ असलेल्या कड्यात गिर्यारोहक अडकला. तब्बल तीन तास अडकून पडलेल्या गिर्यारोहकाची पिंपळेगुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या तीन कर्मचाऱ्यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने प्राणांची बाजू लावून दोरखंडांच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्या गिर्यारोहकाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक व पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी प्राणांची बाजी लावून युवकाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचे आणि तेथील स्थानिक युवकांचे अभिनंदन केले आहे.
महाशिवरात्री निमित्त सिंहगडाच्या परिसरातील शिवकालीन महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी शुभम माने (वय २८, रा. चिखली, पिंपरी चिंचवड) सकाळी एकटाच निघाला. अतकरवाडी मार्गावरुन तो सिंहगडावर आला. गडाच्या माथ्यावरील उदयभान समाधी जवळील मार्गाने तो कोळीवाडा ( ता. वेल्हे) जवळील उंच डोंगरावरील मेंगजाई मंदिर येथे पोहोचला. मात्र उंच डोंगरावरील मंदिर दूर अंतरावर असल्याने तो अर्धा रस्त्यावरुन माघारी निघाला. गडाच्या पायथ्याहून जुन्या मार्गाने शुभम याने सकाळी साडे दहाच्या सुमारास चढाई सुरु केली. तो तानाजी कड्याच्या लगत असलेल्या तटाखाली अडकून पडला. त्याला पुढे जाता येईना आणि खाली माघारी उतरता येईना. दुर्गम ठिकाणी खोल कड्यात तो अडकला होता.
त्यामुळे मदतीसाठी शुभम माने याने जोरात आवाज देणे सुरु केले. त्याचा आवाज ऐकून नरवीर तानाजी मालुसरे समाधीच्या देखभालीसाठी पिंपळेगुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे कर्मचारी सुमित रांजणे, दत्ता जोरकर, राहुल जोरकर या तिघांनी स्थानिक युवक महेश सांबरे, सचिन पढेर, रोहित जोरकर, सचिन भांडेकर, समीर रांजणे, दत्तात्रय जोरकर, नंदु जोरकर यांच्यासह कड्याच्या माथ्यावर धाव घेतली. या सर्वांनी दोरखंडाच्या सहाय्याने तब्बल शंभर फुट खोल दरीतून शुभम माने याला सुखरूप बाहेर काढले. त्याच्या हातापायाला खरचटल्याने जखमा झाल्या होत्या.
शुभम माने तब्बल तीन तास हा कड्यात अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होता. महाशिवरात्री उपवासामुळे तो व्याकुळ झाला होता. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे कर्मचारी आणि स्थानिक युवकांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक व पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी प्राणांची बाजी लावून युवकाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचे आणि तेथील स्थानिक युवकांचे अभिनंदन केले आहे.