पिंपरीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा तुतारी वाजवून जल्लोष..
पिंपरी I झुंज न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आज पिंपरी येथे मध्यवर्ती कार्यालयात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आनंद उत्सवाची सुरवात एचए कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला तसेच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठ्या जल्लोषामध्ये शुभेछा दिल्या.
सर्व पदाधिकाऱ्यांनी फेटे बांधून तुतारी या चिन्हाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी तुतारीवादकांच्या च्या निनादामध्ये आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या जयघोषाने पिंपरी चौक परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. “आता निनादणार विजयाच्या ‘तुतारी’, याच हाताने पेटविणार धगधगत्या ‘मशाली’, महाराष्ट्रात येणार ‘महाविकास’ आघाडी..!” असा नारा देत कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आनंद उत्सवात जल्लोष केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले कि, आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनात काम करतो त्या माननीय शरद पवार साहेबांनी आयुष्याच्या ५७ वर्षांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीत पक्षाचे चिन्ह गेल्याची कधी पर्वा केली नाही. त्यांनी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढल्या, पैकी पाच निवडणुका अशा होत्या की यामध्ये चिन्ह वेगवेगळी होती. एका निवडणुकीत बैल जोडी नंतर गाई वासरू नंतर चरखा, हात आणि मग घड्याळ या वेगवेगळी चिन्हे राज्यात आणि देशात साहेबांनी पाहिली व अनुभवली आहेत, त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की ती एकदा संघटनेचे चिन्ह आपण काढून घेतले तर त्या संघटनेचे अस्तित्व संपेल असं कधी होत नसते. त्याचबरोबर सकारात्मक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या मातीशी, इथल्या परंपरेशी ऐतिहासिक नाळ जोडलेले मंगलवाद्य असणारी तुतारी हे चिन्ह मिळाल्याने जनतेपर्यंत चिन्ह पोचविण्यास जास्त वेळ लागणार नाही. स्वाभिमानी राष्ट्रवादीची हि तुतारी जनसामान्यांच्या मनावर राज्य करेल हि खात्री आहे”
माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांनी यावेळी तुतारी चिन्ह भेटल्याबद्दल आनंद व्यक्त केला व साक्षात छत्रपती शिवरायांचा हा आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तुतारी हे मंगलवाद्य महाराष्ट्राच्या प्रत्येक मंगल कार्यात वाजविले जाते.. ते विजयाचे व शौर्याचे प्रतीक आहे. असे चिन्ह मिळाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे असे सुलक्षणा शिलवंत यांनी सांगितले.
आयोजित आनंद उत्सवात उपाध्यक्ष विनोद धुमाळ, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, सेवादल अध्यक्ष अरुण थोपटे अल्पसंख्य अध्यक्ष अल्ताफ भाई शेख सामाजिक न्याय मयूर जाधव व्यापार विभाग विजय पिरांगुटे वरिष्ठ अध्यक्ष काशिनाथ जगताप, विवेक विधाते, काशिनाथ बामणे, शोभा साठे, संदीप गायकवाड, जयंत शिंदे, सुशांत खुरासने, योगेश सोनवणे, विजय बाबर, राजू खंडागळे, के. डी. वाघमारे, विशाल जाधव, रोहित जाधव, अर्जुन कदम, बाळसाहेब शिंदे, गणेश भोंडवे, विनायक शिंदे, गणेश काळे, राजरत्न शिलवंत, संतोष माळी, सागर चिंचवडे, योगेश सोनवणे, अनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.