महापालिका आयुक्त आमदारांचे घरगडी आहेत का ? – तुषार कामठे
घोटाळ्याची सखोल चौकशी करा, अन्यथा जन आंदोलनाचा महाविकास आघाडीचा इशारा
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा गौप्यस्फोट विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला. टीडीआर प्रकरणांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून पुणे – बेंगळुरू महामार्गा लगत वाकड परिसरातील मोक्याची दोन हेक्टर जागा केवळ २०० रुपये कोटींना महापालिकेने विकासकाला दिली. आजच्या बाजार मूल्याचा विचार केला तर यामध्ये सुमारे दीड हजार कोटींहून अधिक रकमेचा टीडीआर घोटाळा झाला आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह हे शहरातील तिन्ही आमदारांच्या घरचे घरगडी आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेना माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत – धर, गणेश भोंडवे, अनंत कोऱ्हाळे तसेच संतोष सौंदणकर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तीन आमदार आहेत. परंतु या घोटाळ्यावर त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला नाही. ते गप्प का आहेत, त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून आमदार या घोटाळ्यात सहभागी आहेत का असा प्रश्न जनता विचारत आहे. महापालिकेने २२ क्रमांकाचे आरक्षण बाहेरच्या विकासकाकडून विकसित करण्यापेक्षा महापालिकेने आपल्या ताब्यातील जागेचा विकास स्वतः करावा. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. पालिकेने अनेक आरक्षणे ठेकेदारांना विकासासाठी दिली आहेत. महापालिकेचे आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.
गेल्या दोन वर्षापासून महापालिकेची निवडणूक खोळंबली असल्यामुळे प्रशासकीय राज सुरू आहे. आयुक्तांचा भ्रष्टाचाराचा सुसाट कार्यक्रम सुरू आहे. सरकारने याची चौकशी चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, वेळ पडल्यास अटक करावी. महापालिकेचे जे आर्थिक नुकसान होत आहे याकडे लक्ष दिले नाही तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा चाबुकस्वार यांनी दिला.
ॲड. सचिन भोसले म्हणाले, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे घोटाळे होत आहेत. हा घोटाळा आत्ताच कसा होतो हे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे. यापूर्वीही पिंपरी चिंचवड शहरांमध्ये टीडीआर घोटाळा झाल्याचे आपण पाहिले आहे सरकारने घोटाळ्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. पालकमंत्री, आमदार या घोटाळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारने कारवाई केली नाही तर जनआंदोलन करू, गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असे ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले.
डॉ.कैलास कदम म्हणाले, भाजपच्या मागील पाच वर्षांच्या सत्ता काळात स्थायी समिती अध्यक्षाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्यामध्ये शहरातील तिन्ही आमदारांचा सहभाग आहे. नुकत्याच झालेल्या तळवडेतील दुर्घटनेमध्ये निष्पाप महिलांना प्राण गमवावे लागले. तळवडे परिसराची दुरवस्था पाहता नियोजन शून्य कारभारामुळे आग शमविण्यासाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागली, हे समोर आले. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. गेल्या सात वर्षात जे घोटाळे झाले आहेत त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. दोषी अधिकार्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.