पिंपरी I झुंज न्यूज : पनवेल ते पुणे रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्या धावण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग बनविण्याची आवश्यकता आहे. मार्ग विस्तारीकरण करण्याकरीता नव्याने डीपीआर तयार करावा. या मार्गावर लोकल सुरु झाल्यास रेल्वेला फायदा होईल. वंदे भारतला लोणावळ्यात आणि लोणावळा आणि कर्जत स्थानकांवर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि रेल्वे विभागाचे कार्यकारी संचालक देवेंद्र कुमार यांच्या बरोबर खासदार बारणे यांची बैठक झाली. मावळमधील रेल्वे संदर्भातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. तसेच पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाचे निर्माणीकरणाचे काम सुरु आहे. कर्जत ते लोणावळा दरम्यानच्या मार्गालगत नवीन रेल्वे लाईनचा सर्व्हे, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवावा. पुणे ते लोणावळा दरम्यान तिस-या, चौथ्या ट्रॅकला सहा वर्षांपूर्वी मान्यता मिळाली. परंतु, अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. महारेल काम सुरु करण्यासाठी तयार असून रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याची त्यांना आवश्यकता आहे. पनवेल ते पुणे दरम्यान रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्यांसाठी नवीन रेल्वे मार्गाची निमिर्ती करावी. पनवेल ते पुणे दरम्यान लोकल रेल्वे सुरु केल्यास आर्थिक फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी योजनेतून स्वदेश निर्मित वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. मुंबई-पुणे-सोलापूर दरम्यान एक्सप्रेस धावत आहे. मुंबई, ठाणे, कल्याणनंतर थेट पुण्यात थांबा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात वंदे भारतला एकाही ठिकाणी थांबा नाही. लोणावळा मोठे पर्यटन स्थळ आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यामुळे वंदे भारतला लोणावळ्यात थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.
लोणावळा, कर्जत रेल्वे स्थानकांवर ‘या’ गाड्यांना थांबा द्या
कोरोनानंतर सर्व लांबच्या रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. परंतु, कोरोनापूर्वी असलेले थांबा बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यापारी, पर्यटकांचे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकांवर कोयना, हैद्राबाद, कोणार्क, चेन्नई, गदक, सिद्धेश्वर, कन्याकुमारी, कोल्हापूर-अहमदाबाद, मुंबई-पधानपूर, कोल्हापुर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस आणि पुणे-कर्जत पैसेंजर या 11 गाड्यांना थांबा द्यावा. तसेच लोणावळा स्थानकावर मद्रास सीएसएसटी सुपरफास्ट, एलटीटी सीबीइ, अहमदाबाद हमसफर, एलटीटी मद्रास, एनसीजे सीएसएमटी, जोधपुर, हुसैन सागर एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट, दादर पदुचेरी, सीएसएमटी चेन्नई एग्मोरे मेल, सिद्धेश्वर आणि मुंबई-लातुर एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे थांबा देण्याची मागणीही खासदार बारणे यांनी केली.
पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा
कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन आता बंद आहे. पुणे-लोणावळा मार्गावर विद्यार्थी, महिला, शेतकरी, नोकरदार, पर्यटक अशा अनेक घटकातील हजारो प्रवासी प्रवास करतात. तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड मधील औद्योगिक वसाहतींमध्ये दुसऱ्या शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी साडेअकरा ते अडीच वाजताच्या कालावधीत येणाऱ्या लोकलचा मोठा फायदा होतो. त्यामुळे दुपारच्या वेळेत लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.