पीएमआरडीए, वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धडक कारवाई
अखेर ! हिंजवडी लक्ष्मी चौक ते मारुंजी रस्त्याने घेतला मोकळा श्वास
हिंजवडी I झुंज न्यूज : बेकायदा अतिक्रमणांचा विळखा घातलेल्या आयटीपार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला. शूक्रवारी (ता. २७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. या अचानक झालेल्या कारवाईने आयटीनगरीतील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लक्ष्मी चौक ते मारुंजी शिंदे वस्ती पर्यंतच्या शेकडो अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत सुमारे साडे सात हजार अतिक्रमणे हटविण्यात आली. हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असताना हे रस्त्यातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे कोंडीत भर घालत होती. त्यामुळे आयटीयन्ससह सर्वांचाच जीव मेटाकुटीला आला होता.
अखेर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली धकड करावाईला सुरुवात झाली. पाहिल्याच दिवशी रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने, टपऱ्या, बोर्ड, हातगाड्या हटविण्यात आल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस सुनील पिंजन व पिएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
तीन जेसीबी व एक अग्निशामक बंब यांच्या साहायाने ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली त्यासाठी दोन वाहतूक पोलिस अधिकारी, दहा कर्मचारी, हिंजवडी ठाण्याचे चार अधिकारी व दहा कर्मचारी तसेच पीएमआरडीएचे कर्मचारी तैनात होते. ही कारवाई सलग चार दिवस चालणार आहे.
कासारसाई पर्यंत रस्त्याच्या दूतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. रहिवासी आणि आयटी व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, परंतु बेकायदेशीर बांधकामे परत येण्याबद्दल आणि परिसरात नियमित गस्त घालण्याची गरज याबद्दल आयटीकर चिंता व्यक्त करत आहेत.