उद्धव ठाकरे साधणार समाजवादी जनता परिवाराशी संवाद
मुंबई I झुंज न्यूज : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवसेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी गेली अनेक दशके समाजवादी आणि धर्मनिरपेक्षवादी विचारांच्या पक्षांपासून अंतर राखून ठेवणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा समाजवादी पक्ष आणि संघटनांसोबत राजकीय वाटचाल करणार आहे. येत्या रविवारी १५ ऑक्टोबर रोजी राज्यातील समाजवादी जनता परिवारातील सर्व पक्ष आणि संघटना यांच्यासोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार असून या बैठकीत समाजवादी- शिवसेना (उबाठा) यांच्या युतीवर शिक्कामोर्तब केले जाईल.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर आजवर त्यांनी २२ वेळा धर्मनिरपेक्षवादी(सेक्युलर) पक्षांसोबत युती केली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्या पक्षासोबत त्यांनी केलेली युती अजूनही मुंबईकरांच्या स्मरणात आहे. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आता उद्धव ठाकरेही वाटटाल करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी युक्रांदच्या एका कार्यक्रमासा हजेरी लावली. आता समाजवादी जनता परिवारातील दिग्गजांशी ते रविवारी एम.आय.जी क्लब येथे संवाद साधून युती भक्कम करणार आहेत. संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षासोबतही त्यांनी युती केली आहे.
“शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक १९६८ साली लढवली. त्यात त्यांची युती राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेला प्रजासमाजवादी पक्षाशी झाली होती. मधू दंडवते आणि ना.ग. गोरे हे त्या पक्षाचे नेते होते. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतले पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते होते. तोपर्यंत शिवसेनेचे प्रजासमाजवादी पक्षाशी फाटलं होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचा पाठिंबा घेतला.१९७३च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाच्या रा. सू. गवई गटाशी आघाडी केली होती.त्याचवर्षी शिवसेनेने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत सिंडिकेट काँग्रेसच्या मदतीने ३२ वर्षांच्या सुधीर जोशींना मुंबईचं महापौर बनवलं. त्यात शिवसेनेला मुस्लीम लीगच्या एका नगरसेवकाचाही पाठिंबा होता,” अशी माहिती विजय सामंत आणि हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या `सुवर्णमहोत्सवी शिवसेना` या पुस्तकात दिली आहे. गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या पुलाला भाजपचा विरोध असतानाही मृणाल गोरे यांचे नाव महापालिकेत सत्तेत असताना शिवसेनेने दिले होते.
समाजवादी-शिवसेना युती -कपिल पाटील
“पुण्यात समाजवादी विचार मानणा-या जनता परिवारातील पक्षांची, संघटनांची एक बैठक २४ ऑगस्ट रोजी पुण्यात झाली होती. या बैठकीनंतर ही दुसरी बैठक मुंबईत घेण्यात येत आहे. या बैठकीलाही समाजवादी परिवारातील सर्व पक्ष, संघटना एकत्र येत असून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सु्द्धा या बैठकीला निमंत्रितांशी संवाद साधणार आहेत. इंडिया आघाडीत समाजवादी विचारांचे पक्ष आणि ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र आहेच. आता महाराष्ट्रातही भविष्यात एकत्र राहून निवडणुका लढण्यावर जवळपास एकमत झाले आहे,” अशी माहिती जनता दल (यूनाइटेड)चे राष्ट्रीय सरचिटणीस कपिल पाटील यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. समाजवादी जनता परिवारातील पक्ष, आमच्या विविध संघटनांकडे राज्यातील किमान ७ ते ८ टक्के मते आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीसोबतच राज्यातील भाजप-महायुतीविरोधी आघाडी राजकीयदृष्ट्या भक्कम होईल, यात शंकाच नाही, असेही पाटील म्हणाले.
रविवारच्या समाजवादी परिवाराच्या बैठकीस निवडक दीडशे जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचा समावेश आहे. कामगार नेते शशांक राव, असीम राव, जार्ज फर्नांडिस यांचे सहकारी सुभाष मळगी, जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष निहाल अहमद यांच्या कन्या शान-ए- हिंद यांची विशेष उपस्थिती या बैठकीत असेल.