तीन दिवसानंतर उपोषण सोडले ; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरीत गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या सतीश काळे यांनी उपोषण सोडले आहे. काळे यांची प्रकृती खालावल्याने उपोषण सोडण्याचा निर्णय हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने घेण्यात आला.
यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी नाईकवाडे तसेच जन आंदोलन चळवळीचे मार्गदर्शक मानव कांबळे यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले. पुढील उपचारासाठी काळे यांना तात्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठा समाजास आरक्षण मिळावे, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतिश काळे व सहकारी पिंपरीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपोषणास बसले आहेत.
सतीश काळे हे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. परंतू त्यांची अचानक तब्येत खालवल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. या ठिकाणी मराठा समन्वय समितीची सर्व टीम उपस्थित झाली. सर्वांच्या एक मताने निर्णय घेण्यात आला व त्यानंतर सतीश काळे यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती करण्यात आली.
यावेळी समन्वय समितीने म्हटले की, आपला एक-एक कार्यकर्ता समाजासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास होईल असे होऊ नये. कार्यकर्ते व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आमरण उपोषणकर्ते सतीश काळे यांनी उपोषण सोडले. नंतर लगेच त्यांना वायसीएम रुग्णालयात भरती करण्यात आले.
सध्या सतीश काळे यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येत्या दोन दिवसात काळे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल,असे डॉक्टरांनी सांगितले आहे.