कान्हूर मेसाईत शिक्षकदिनी शिक्षक व सेवकांचा गौरव
शिक्रापूर I झुंज न्यूज : विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत, यासाठी ज्या काही शाळा उपक्रमशील म्हणून नावाजल्या आहेत त्यात कान्हूर मेसाईच्या विद्याधाम विद्यालयाचा समावेश असल्याचे गौरवोद्गार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी काढले.
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम विद्यालयात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते सर्व शिक्षक व सेवकांना गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन शिक्षक दिनानिमित्त गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे होते तर याप्रसंगी सरपंच चंद्रभागा खर्डे, मंत्रिमंडळ मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे, संस्थेचे सचिव सुदाम तळोले, उद्योजक रोहिदास ढगे, अमोल पुंडे पाटील, सदाशिव पुंडे, भास्कर पुंडे, मोहन पुंडे, माजी सरपंच बंडू पुंडे, बापूसाहेब ननवरे, दीपक तळोले, सोपान पुंडे, उपसरपंच नंदकुमार गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे, किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पुंडे, प्राचार्य अनिल शिंदे, पर्यवेक्षक किसन पांढरे, प्रवीण बांदल यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विद्याधाम माध्यमिक व विद्यालयासाठी मंजूर केलेल्या स्वागत कमानीचे भूमिपूजन प्रदीप वळसे पाटील यांनी केले. तसेच कान्हूर मेसाई ग्रामस्थांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य अनिल शिंदे यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आणि पर्यवेक्षक किसन पांढरे यांनी आभार मानले.
कान्हूर मेसाईतील विद्यालयाने दोन वर्षांपासून अभ्यासिका सुरू केली असून कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना लागणारी सर्व पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येतात नुकतेच या अभ्यासिकेतील तेरा मुले यावर्षी अशोक मिडगुले या माजी विद्यार्थ्यांने प्रशिक्षण काळात मिळालेला पहिला पगार प्राचार्य अनिल शिंदे यांना गुरूदक्षिणा म्हणून देऊ केला असल्याने असे गुणवंत विद्यार्थी आम्ही घडवू शकलो हाच आमचा मोठा सन्मान असल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले.