पुणे I झुंज न्यूज : पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह, अनुवाद आणि कादंबरी यात विपुल लेखन केले आहे. आजपर्यंत त्यांची 50 पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध आहेत. अगदी कमी वयात त्यांनी साहित्य क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
उरुळी कांचन येथील मातोश्री गार्डनमध्ये पानिपतकार विश्वास पाटील यांनी आजच्या पिढीच्या युवा साहित्यिकांची भेट घेतली. तब्बल दोन तास चाललेल्या या चर्चेत त्यांनी युवा लेखकांना मार्गदर्शन केले व त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.
यावेळी पुणे जिल्ह्यातील आघाडीचे लेखक सचिन बेंडभर यांचा नुकताच प्रकाशित झालेला बालकाव्यसंग्रह मामाच्या मळ्यात त्यांनी जाणून घेतला. फवारणी कथा संग्रहातील त्यांच्या ग्रामीण कथांचा विषय समजून घेतला तर रानपाखरांची शाळा या कादंबरीच्या कथानकाची चर्चा केली. तसेच त्यांच्या झुंज एका पेशव्याची या कादंबरीचे कौतुकही केले. सचिन बेंडभरांसारखे कसलेले लेखन करणारे साहित्यिक याच पिढीतून तयार होत आहेत आणि वाचकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे, हे मराठी भाषा संवर्धनासाठी आशादायी आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी साहित्यिक शहाजी नगरे, सोपान खुडे, खलील शेख आदी उपस्थित होते.