भिडेवर कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात काळी फित लावून स्वातंत्र्य दिनाला आंदोलनाचा इशारा
पिंपरी I झुंज न्यूज : देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्या संभाजी भिडेवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यदिना दिवशी ध्वजवंदन करण्याचा नैतिक अधिकार नाही. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत संभाजी भिडेवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा काळ्या किती लावून तीव्र आंदोलन करू,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांना काळे यांनी निवेदन देऊन संभाजी भिडेवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला.
काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गेल्या अनेक दिवसांपासून बेताल वक्तव्य करत आहे. बहुजनांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या महापुरुषांचा जाहीररित्या अवमान करत आहे. ही गोष्ट संताप आणणारी आहेच. त्यावर त्वरित आळा घालण्यासाठी भिडेच्या कायदेशीर मुसक्या आवळने आवश्यक होते. मात्र शासन आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बेताल वक्तव्याने मोकाट सुटत भिडे कडून देशाचाच अपमान करण्याचे काम केले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन नसून काळा दिवस आहे. 15 ऑगस्टला उपवास करून काळा दिवस पाळून निषेध व्यक्त करावा असे वक्तव्य भिडे याने केले आहे. हा संपूर्ण देशाचा, क्रांतिकारकांचा आणि देशासाठी शाहिद झालेल्या जवानांचा अपमान आहे.
या भिडेला अटक करण्याची मागणी आम्ही सातत्याने केली आहे. 28 जून तसेच 29 जुलै रोजी पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना त्याबाबत तक्रारीचे निवेदन दिले आहे. त्याची दखल घेतली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरातील शंभरावर अधिक संघटना तसेच विविध राजकीय पक्ष यांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये शेकडोंच्या लोकांनी सहभाग होता. तरी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. ही कारवाई न करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिनादिवशी ध्वजवंदन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. विधानभवनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देखील संभाजी भिडे आपला गुरुजी असल्याचे जाहिर वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे की काय असा प्रश्न पडतो.
त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट पूर्वी पोलिस प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनानुसार मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे वर कायदेशीर कारवाई करून अटक करावी.अन्यथा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना ध्वजवंदन करू देणार नाही. तसेच लोकप्रतिनिधींनी शासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केल्यास काळ्या फिती लावून संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन छेडू,असा इशारा काळे यांनी दिला आहे.