आई पत्नीच्या स्मरणार्थ दवणे परिवाराचा एक अनोखा उपक्रम
थेरगाव I झुंज न्यूज : कुटुंबातील व्यक्ति जाते पण तिच्या आठवणी कायम राहतात. हीच आठवण जपण्यासाठी थेरगावच्या दवणे कुटुंबाने एक अनोखा उपक्रम राबवला. आई कै.सौ. प्रभावती लक्ष्मण दवणे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. मुळशी तालुका कासारसाई हे त्यांचे माहेर. तेथील प्राथमिक शाळेत त्यांचे शिक्षण झाले. हीच बाब लक्षात घेऊन त्यांचे पती श्री लक्ष्मण दवणे यांनी अनोख्या पद्धतीने पत्नीच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला.
पत्नीची वाचनाची आवड आणि सामाजिक भान जपत त्यांनी जि.प. शाळा कासारसाई येथील ग्रंथालयाला १२५ पुस्तके व ग्रंथालयासाठी आवश्यक फर्निचर सप्रेम भेट देण्यात आले. यामध्ये गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ४० शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका संच समाविष्ट आहेत. याशिवाय शाळेच्या आवारात आपल्या पत्नीचा स्मृतींचा कायम दरवळ असावा या सदिच्छाभावाने काही फुल झाडे शाळेला अर्पण करण्यात आली.
या स्तुत्य उपक्रमात त्यांचे चिरंजीव दिपक दवणे, प्रकाश दवणे व कन्या ज्योती दवणे यांनीही सहकार्य करून सहभाग घेतला. शाळेत झालेल्या साहित्य वाटप समारंभात लक्ष्मण दवणे व त्यांचे कुटुंबीय तसेच मानवाधिकार संरक्षण संस्थेचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेला भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी “पुस्तकाच्या रूपाने कै.सौ. प्रभावती दवणे या कायम स्मरणात राहतील आणि श्री. लक्ष्मण दवणे यांनी केलेले हे कार्य समाजातील अनेकांना दिशादर्शक ठरेल” अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.प्रमोद केसरकर. राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव नवघण, राष्ट्रीय निरिक्षक रामदास खोत, ओमकार शेरे, अध्यक्ष पुणे जिल्हा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर दिनकर पवळे, तसेच सुदाम खाणेकर, शिवाजी खाणेकर, मारुती खाणेकर, बाळासाहेब जगताप (माजीसैनिक), रवींद्र आडकर, आशिष गायकवाड, संतोषी पवार आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री.मलगुंडे सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे संचालन श्री.तांबोळी सर यांनी केले.