मुंबई I झुंज न्यूज : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हा निमंत्रक पदी ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली.
राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत.. त्यानुसार सुनील वाळुंज यांची पुणे जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांचे निमंत्रक आणि समन्वयक यांच्या नियुक्त्या करण्याची जबाबदारी सुनील वाळुंज यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नवीन सर्व नियुक्त्या पुढील दोन वर्षांसाठी असतील.
पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जात असलेले खोटे खटले, पत्रकारांना देण्यात येणारया धमक्या बाबत आवाज उठविण्याचे काम पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करते. सर्व जिल्ह्यातील नियुक्तया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदयाची माहिती जास्तीत जास्त पत्रकारांना व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतले जाणार आहे. कायद्याच्या प्रती पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्याच्या सूचनाही वाळुंज यांना करण्यात आल्या आहेत.