पुणे I झुंज न्यूज : कुटुंबात पती, पत्नी यांचे नाते नेहमी वेगळे असते. आयुष्यभर त्यांची एकमेकांना साथ असते. यामुळे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते, असे म्हटले जाते. पुरुष आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असतो. कधी तिला आवडणारे गिफ्ट देतो, कधी फिरायला घेऊन जातो. पुणे शहरातील एका महिलेने वेगळा उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये केवळ विवाहित पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. त्याचा फायदा अनेक पुरुष घेत आहेत. त्यामुळे त्या पुरुषांची पत्नीसुद्धा खूश होत आहेत.
काय आहे फंडा
तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येतो का? महिलांना नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न असतो. परंतु पुरुषांना असे कोणी विचारत नाही. परंतु आता जग बदलत आहे. पुरुषांप्रमाणे महिलाही बाहेर काम करत आहेत. त्यामुळे पुरुषांनाही चांगला स्वयंपाक यावा, यासाठी पुणे येथील महिलाने उपक्रम सुरु केला आहे. पुण्यातील मेधा गोखले यांनी फक्त पुरुषांसाठी कुकींग क्लास सुरु केला आहे. त्यामध्ये फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जात आहे. चार दिवसांचा हा क्लास आहे.
काय काय शिकवले जाते
चार दिवसांच्या या क्लासमध्ये पुरुषांना अनेक पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पोळी, वेगवेगळ्या भाज्या, पोहे, उपमा आणि मिठाईसुद्धा बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. भाज्या कापण्यापासून प्रशिक्षणाची सुरुवात होते. पीठ मळणेही शिकवले जाते. मसालेदार स्वयंपाक करणेही शिकवले जाते.
हजारापेक्षा जास्त जणांनी घेतले प्रशिक्षण
मेधा गोखले यांच्या क्लासमध्ये आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त पुरुषांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यात डॉक्टर, इंजिनिअर, निवृत्त न्यायाधीश यांचाही समावेश आहे.
काय आहे अनुभव
सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, मी आयटी क्षेत्रात काम करत आहे. माझे काम वर्क फ्रॉम होम सुरु आहे. पत्नी ऑफिसला जात आहे. मग तिच्या मदतीसाठी मी क्लास केला. त्यामुळे ऑफिसमधून आल्यानंतर माझ्या पत्नीला चांगली मदत मी करु शकत आहे.