मुंबई I झुंज न्यूज : विरोधी पक्षातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना सळो की पळो करुन सोडणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या संकटात सापडले आहेत. त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. सोमय्यांचे तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील लोकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. या सगळ्यावरती किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असं सांगताना त्यांनी होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गृहमंत्री फडणवीस यांनी माझी चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या यांचं फडणवीसांना पत्र
मा. देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो.
त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे. कळावे.
‘जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका’
आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत.
ते सांगायचे:" जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका"
नेमके तसेच घडत आहे.
यापुढे देखील बरेच काही घडणार आहे..
जे जे होईल ते पाहत राहावे..
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra @AUThackeray…— Sanjay Raut (@rautsanjay61) July 18, 2023
किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओवर ‘जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका’ असं सूचक टि्वट संजय राऊत यांनी केलं आहे.