विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाची संख्या अजून घटणार
पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली आहे. विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदेंपाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे वाटचाल सुरू केली आहे.
शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.