थेरगाव I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव व क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक १९/६/२०२३रोजी शाळेच्या सभागृहात महाराष्ट्राचे ६ वेळा प्रतिनिधित्व करीत ६६ व्या १९ वर्षे शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दिल्ली येथे कर्णधार पद भूषवीत महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या तसेच चौथ्या, पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी एकूण पाच लाखांचे महाराष्ट्र शासनाचे बक्षीस मिळविणाऱ्या महापालिकेच्या राष्ट्रीय खेळाडू गुणवंत विद्यार्थ्यांचा खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
खेळाडू मनीषा राठोड हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत ४ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागासह पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाचे ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले, खेळाडू भूमिका गोरे हिने महाराष्ट्राचे ३ वेळा प्रतिनिधित्व करीत एक वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधार पद भूषिवीत पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाचे ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले, खेळाडू प्रतीक्षा लांडगे हिने ६६ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळविले, खेळाडू रेखा राठोड हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला, खेळाडू श्रावणी सावंत व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रूपाली त्र्यंबक डोंगरे हिने विद्यालयाचे सलग ३ वर्षे शालेय राज्यस्तर स्पर्धेत पदक मिळविले आहे.
राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे बन्सी आटवे, सोनाली जाधव यांच्यासह मार्च २०२३ चे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाच्या प्रतीक्षा परशुराम कांबळे ९२.४० टक्के, सिद्धीनारायण पवार ९२.४०% व आदित्य चंद्रकांत कांबळे ९०.२०% गुण मिळवून महानगरपालिकेच्या एक लाख रुपयांचे बक्षिसाचे मानकरी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महादेव कसगावडे क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांनी भूषविले. यावेळी मनोज लोणकर उपायुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड मनपा, अनिता केदारी क्रीडा अधिकारी क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड मनपा, दत्तात्रय झिंजुर्डे सहकार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, अभिषेक बारणे माजी नगरसेवक, तानाजी बारणे सामाजिक कार्यकर्ते, संतोष बारणे सामाजिक कार्यकर्ते, बाळासाहेब वाघमोडे, बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव व दीपक कन्हेरे क्रीडा पर्यवेक्षक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले ,”मी नगरसेवक असताना महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव येथे माध्यमिक विद्यालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीची उभारणी केली. त्याच शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करीत आहेत. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. परिस्थितीवर मात करून त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे .अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च महापालिका प्रशासनाने उचलावा व पुढे त्यांना नोकरीत प्राधान्य द्यावे.
“खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेल्या महापालिकेच्या दिलीप वेंगसकर क्रिकेट अकॅडमीची आठवण करून देत ऋतुराज गायकवाड सारखा क्रिकेटर आज देशासाठी खेळतो आहे. २००७ साली दूरदृष्टीने उभारलेल्या प्रकल्पाचे फलित असल्याचे खासदार म्हणाले.