दिल्ली I झुंज न्यूज : देशाला आज नवीन संसद भवन मिळाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. यामध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक सेंगोल अर्थात राजदंडाची स्थापना पंतप्रधान मोदींनी केली आहे.
या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजने झाली. पीएम मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या पूजेला बसले होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला. हे राजदंड हातात घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.
देशाच्या नवीन संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या शेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे. भारताचे नवीन संसद भवन इतके सुंदर आणि आलिशान आहे की त्यापुढे परदेशी संसदही फिके पडत आहे. या संसद भवनाची रचनाच खूप अप्रतिम करण्यात आली आहे. ज्या मजूरांनी या संसद भवनाची इमारत बांधली त्यांची यावेळी मोदींनी भेट घेतली. राजदंड बसवल्यानंतर मोदींनी या मजुरांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.
नव्या संसद भवनातील राजदंडाचे वैशिष्ट्य काय ?
– सातव्या शतकात एका तमिळ संताने या राजदंडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते.
– अफाट साम्राज्यविस्तार करणाऱ्या चोल राजघराण्यात सत्तेचे हस्तांतरण या राजदंडाद्वारेच केले जायचे.
– इंग्रजांकडून सत्ता सोडायचा क्षण आला तेव्हा हस्तांतर म्हणजे नेमकं काय करायचं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांनी विचारलं. त्यावर नेहरुंनी सी राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली.
– राजगोपालचारी यांनी तामिळनाडूतल्या चोल साम्राज्यातल्या या जुन्या परंपरेची माहिती दिली होती.
– त्यानुसार हा राजदंड 15 ऑगस्ट 1947 च्या सत्ता हस्तांतरणावेळी वापरण्यात आला होता.
– त्यानंतर हा राजदंड प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवला गेला होता.
– आता हा राजदंड नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आला आहे.
– संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्जीशेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे.