– आमदार महेश लांडगे यांचा पुढाकारातून विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
भोसरी I झुंज न्यूज : भोसरी विधानसभा मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना रोजगार, कौशल्य आणि उद्योजकता मार्गदर्शन मिळावे. तसेच, विविध शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळावी, याकरिता भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले आहे.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर’’ राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार, भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच शाळा- महाविद्यालयांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथे दि. १ जून २०२३ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत विविध विषयावर शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन शिबिरात सहभागी होण्याकरिता इयत्ता ८ ते १२ वी पर्यंत आणि आयटीआय (इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वयक निखील काळकुटे यांनी दिली.
“शिबिरात शैक्षणिक विषयातील तज्ञ व व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या भविष्यात मोलाचा ठरणार आहे. त्याकरिता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे. शिबिरामध्ये शालेय प्रवेश व अभ्यासक्रम, कलामापन चाचणी, स्कॉलरशिप व कर्ज योजना, व्यवसाय व त्यासाठी कर्ज आणि करिअर अशा महत्त्वपूर्ण विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असेही निखील काळकुटे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी कुंदन लांडगे- 9890800066 आणि निखील काळकुटे- 9168683949 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.