पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे १० जूनपूर्वी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या संदर्भात राऊतांच्या बैठका देखील झाल्या आहेत, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
काय म्हणाले नितेश राणे… ?
“महाराष्ट्राच्या राजकारणात हा भूकंप होणार आहे. 10 जूनच्या आधी किंवा राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनी संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबद्दलच्या त्यांच्या बैठका झाल्या आहेत. मला ही माहिती सूत्रांनी दिली आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.
तसेच “संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिका पाहा. शरद पवारांच्या राजीनामा आणि नंतरची राऊत यांची भूमिका पाहा. त्यातून तुम्हाला सर्व अर्थ लागतील,” असेही नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“संजय राऊत सातत्याने अजितदादांवर (Ajit Pawar) टीका करत आले आहेत. अजितदादांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षप्रवेश करतो, अशी अटच त्यांनी घातली आहे. त्यामुळे ते सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत, उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे,” असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.