राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर नेहमीच राजकीय पक्ष आरोप करीत असतात. काही पक्षांना किंवा ठराविक नेत्यांबद्दल अण्णांचा सॉफ्टकॉर्नर असतो, अशी चर्चा रंगवली जाते. परंतु अण्णा ज्यांचे चुकलं त्यांना चुकलेच म्हणतात. जे चांगलं काम करतात, त्यांचं कौतुक करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. ही अण्णांची खासियत आहे.
राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव हे माझे कुटुंब आहे या पद्धतीने सर्वांनी काम केले तर कोरोनाबाबतची लोकांची भीती नाहीसी होईल. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल. अतिशय चांगली संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
राळेगण सिद्धी (ता.पारनेर) येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ समाजसेवक यांची तपासणी करून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी हजारे बोलत होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे, विस्ताराधिकारी पोपट यादव, माजी सरपंच जयसिंग मापारी, शाम पठाडे उपस्थित होते.
“हजारे म्हणाले, आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय कर्मचारी चांगले काम करत आहात. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावा. तहसीलदार देवरे यांनी कोरोना परिस्थिती खूप चांगली हाताळली तुमच्या ऑडिओ क्लिपने चांगली जनजागृती झाली. तुम्ही सगळे चांगले काम करा व तालुक्याचे नाव उंचावर न्या, असेही त्यांनी सांगितले.”
सभापती गणेश शेळके यांनी या उपक्रमसंदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली. तालुक्यातील सर्वच गावामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. ज्या नागरिकांना कोरोनासदृश्य लक्षणे असतील, त्यांनी त्वरित आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे यावेळी त्यांनी सांगितले.
तहसीलदार देवरे यांनी आपले कुटुंब आपली जबाबदारी याप्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांना भाग पाडावे. त्यामुळे आपले कुटुंब कोरोनापासून मुक्त होऊ शकते व कुटुंब मुक्त झाले तर गाव मुक्त होईल. गाव मुक्त झाले तर तालुका मुक्त होईल हेच आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.