नवी मुंबई I झुंज न्यूज : जाणीव प्रकाशन, नवी मुंबई चा पुरस्कार वितरण सोहळा वाशी येथे नुकताच दिमाखात संपन्न झाला. जाणीव प्रकाशन, कोकण मराठी साहित्य परिषद, आगरी विकास साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार श्री. ए. के. शेख होते. नाटककार, कादंबरीकार, कवी आणि जाणीव प्रकाशनचे प्रकाशक श्री. मोहन भोईर यांनी विविध साहित्य प्रकारांच्या पुस्तकांना जाहीर केलेले पुरस्कार दोन वर्षे कोरोना मुळे घेता आले नाहीत. १६४ पुस्तके जाणीव प्रकाशन ने आजवर प्रकाशित करून अनेकांना प्रसिद्धीच्या प्रकाशात आणले. विविध उपक्रम करून प्रसंगी आर्थिक भुर्दंड केवळ साहित्यिक हौसेपायी सोसला, असे प्रास्ताविकात सांगितले.
सर्वोत्कृष्ट काव्य संग्रह- कै.दिनानाथ सुतार स्मृती पुरस्कार-अस्वस्थ वर्तमानातील मी-बाबू फिलीप डिसोजा (निगडी, पुणे) आणि सर्वोत्कृष्ट कथासंग्रह – कै.यमुनाई भोईर स्मृती पुरस्कार-एक झुंज-माधुरी वैद्य डिसोजा (कुमठेकर) ( निगडी पुणे-४११०४४) यांना सन्मान पत्र, आकर्षक स्मृती चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेते विशाल पाटील, मुकुंद महाले,अनिल पिसे (आफ्रिका) प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री. धनंजय गोंधळी यांच्या “शब्दांची झाली फुले” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. वार्धक्यामुळे ते येऊ शकले नाहीत.
कवी संमेलनात पुंडलिक पाटील, जितेंद्र लाड आदिंनी आपल्या कविता सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री सौ. दमयंती भोईर यांनी केले. आभारप्रदर्शन आशा पाटील यांनी केले.