पुणे I झुंज न्यूज : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होत आहे. विशेषत: अजित पवार हे भाजपसोबत जातील अन् सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळातील या सगळ्या चर्चांच्या वावड्या उठव असतानाच ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
अध्यक्ष निवडीच्या तारखेवर दावा
अॅड. असीम सरोदे यांनी तर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवडीची तारीख सांगतली आहे. शिवाय त्यानंतर होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींबाबतही दावा केला आहे. “राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मे च्या आधी नक्की होतील. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की”, असं असीम सरोदे म्हणाले आहेत.
“…अजितदादा पुढे नेतील”
शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल याविषयी तर्क लावले जात आहेत. यात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची नावं आघाडीवर आहेत. याबाबत रिपाइं खरातचे अध्यक्ष सचिन खरात यांनीही भाष्य केलंय.
“शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्ती घेत आहे, असं जाहीर केलं आहे. यावरून राज्यामध्ये विविध पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चर्चा करत आहेत. परंतु आदरणीय शरद पवारसाहेबांचा जो फुले, शाहू, आंबेडकर यांचा जो विचार आहे तो विचार पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे. हाच विचार राज्याला आणि देशाला तारू शकतो. हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार नक्कीच आदरणीय अजितदादा पवार पुढे नेतील, असा विश्वास वाटतो”, असं सचिन खरात म्हणाले आहेत.