मुंबई I झुंज न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्रात येणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात याबाबत मोठी घोषणा केली आहे. ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्र सरकारला देण्यास सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे लवकरच परत मिळण्याची शक्यता आहे. शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषकेच्या 350 व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त ही तलवार आणि वाघनखे राज्य सरकारच्या ताब्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी याबाबत घोषणा केली.
लवकरच बैठक
शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याबाबत नियोजन आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सांस्कृतिक आदानप्रदान
ब्रिटन आणि भारत सरकार यांच्यात काल मुंबईत बैठक पार पडली. यी बैठकीत सांस्कृतिक आदानप्रदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटनमध्ये सादरीकरण करतील तर ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येतील. तसेच महाराष्ट्राचे 25 विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील. ब्रिटनचे 25 विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात होणार आहे.
ब्रिटिश काऊंन्सिलेटशी चर्चा
सुधीर मुनगंटीवार आजच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात म्हणाले, आज मी मोठ्या अभिमानाने सांगतो की ही रायगडची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्यभिषेक मोठ्या धामधुमीत येथे साजरा करणार आहेत. यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की काल, ब्रिटिश काऊंन्सिलेटशी आमची चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्रातील जनतेसाठी दर्शनाकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.