पिंपरी | झुंज न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर माफ करण्याचा शासन आदेश शुक्रवारी (दि. ३) जारी केला आहे. त्यामुळे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शास्तीमाफीसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. शास्ती माफीचा शासन आदेश जारी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना एक प्रकारे श्रद्धांजलीच अर्पण केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती. तसेच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारानिमित्त रहाटणी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर सांगवी येथे झालेल्या सभेत स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढण्याची घोषणा केली होती. या दोघांनीही अखेर दिलेला शब्द पाळला असून, शहरातील अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर माफ करण्याचा शासन आदेश जारी केला आहे.
या शासन आदेशानुसार पिंपरी-चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर माफ झाला आहे. अनधिकृत बांधकामधारकांनी मूळ मालमत्ता कर भरल्यानंतर शास्तीकर आपोआप पूर्णपणे माफ होणार आहे. ३ मार्च २०२३ पर्यंतच्याच अनधिकृत बांधकामांना हा शासन आदेश लागू असणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने काढलेल्या या शासन आदेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुमारे एक लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनधिकृत बांधकामधारकांचा शास्तीकर माफ व्हावा यासाठी सर्वाधिक पाठपुरावा हा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारकडे केला होता. गेल्या दहा वर्षांपासून ते शास्तीकराविरोधात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडत आहेत. त्यांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी आणि शास्तीकर माफीसाठी २०१४ मध्ये आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. शास्तीकर कायमचाच रद्द व्हावा यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर निधनानंतर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकराचा बोजा लादण्यात आला होता. त्यामुळे सुमारे १ लाख मिळकतधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शास्तीकरण पूर्ण माफीची घोषणा झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. शास्तीकर माफीच्या लढ्यामध्ये मोठे योगदान देणारे दिवंगत लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आपआपल्या परीने पुढाकार घेतला. त्या सर्वांचे धन्यवाद देतो.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.