(प्रतिनिधी – प्रसाद बोराटे)
भोसरी I झुंज न्यूज : गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी मराठा वॉरीअर्सने पुणे ते नेपाळ सायकल मोहीम फत्ते केली असून या मोहिमेचा शुभारंभ १२ फेब्रुवारी रोजी भोसरी येथून झाला होता. पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेची सुरुवात झाली.
पुणे ते नेपाळ या मोहिमेचे अंतर २०२३ किलोमीटर आहे.दोन देशांना जोडणाऱ्या या प्रवासात सर्व सहभागी वॉरीअर्सने मैत्रीचा, सामाजिक एकतेचा संदेश देत प्रवास केला. भारताने ७५ वर्षात केलेल्या प्रगतीचा आलेख त्यांनी सर्वदूर पोहचवला.
यावेळी त्यांचा सुनौली बॉर्डर ते काठमांडू प्रवास हा खडतर राहिला. या मोहिमेत संदीप जगताप, बजरंग मोळक, विश्वास काशीद, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, नारायण मालपोटे, निलेश धावडे हे वॉरीअर्स सहभागी झाले होते.
मराठा वॉरीअर्सने यापूर्वी २०१७ मध्ये लेह लदाख बुलेट राईड, २०१९ पुणे ते वाघा बॉर्डर सायकल प्रवास, २०२१ मध्ये पुणे ते पानिपत सायकल प्रवास आणि २०२२ मध्ये हम्पी बुलेट राईड अशा साहसी मोहिमा यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत.