पिंपरी I झुंज न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांसाठीची धन्वंतरी स्वास्थ्य योजना कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी स्वास्थ योजना ही वैद्यकीय उपचार घेणेकामी लागू करणेत आली आहे. ही योजना १ सप्टेंबर २०१५ पासून चालू आहे. या योजनेवर महापालिकेचा जास्त खर्च होत आहे, असे कारण सांगून योजना बंद करून ठेकेदारामार्फत विमा पॉलिसी लागू करण्याचा घाट घातला जात आहे.
“या योजनासाठी कर्मचाऱ्यांकडून मासिक वर्गणी घेतली जाते. या धन्वंतरी योजनेअंतर्गंत मनपाच्या कर्मचा-यांना व्यवस्थित वैद्यकीय उपचार मिळत आहेत. त्याबाबत ते समाधानी आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या काळात मनपा कर्मचा-यांना धन्वंतरी योजनेअंतर्गंत वैद्यकीय उपचार सुरु ठेवणे अत्यावश्यक आहे.”
तरी मनपाचे कर्मचारी कोरोना सारख्या महामारीमध्ये कोरोना संसर्गांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. त्यातच जर धन्वंतरी योजना बंद केली, तर या कर्मचा-यांना कोरोनाच्या काळात वैद्यकीय उपचार वेळेवर मिळणार नाहीत. त्यामुळे जोपर्यंत कोरोना संसर्ग संपत नाही, तोपर्यंत तरी धन्वंतरी योजना बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांना केली आहे.