– संभाजी ब्रिगेडच्या वतीने छेडलेल्या आंदोलनाचे यश
पिंपरी I झुंज न्यूज : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा राजीनामा मंजूर होणे हा पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी राज्यपालांच्या चुकीच्या वक्तव्यांचा विरोध करत आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाला यश आले असून अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर करण्याची नामुष्की राज्य आणि केंद्र सरकारवर आली असल्याचेही काळे म्हणाले.
सतिश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. राज्याच्या या ऐतिहासिक भूमित छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जोपासला जातो. या महापुरूषांचे विचार हे अन्यायाविरोधात लढा द्यायला प्रेरित करणारे आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यानंतर झालेल्या विरोधातून त्याचा प्रत्यय आला आहे. महापुरूषांच्या विषयी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी खालच्या स्तराला जाऊन भाषा वापरली. त्यांची ही वक्तव्ये राज्यपाल या पदाला साजेसे नाहीत. याचा सर्वच स्तरातून निषेध झाला होता.
संभाजी ब्रिगेडने देखील त्यांचा जाहिर निषेध करत त्यांच्याविरोधात आंदोलन केले. ते जिथे दिसतील तिथे निषेध करण्याचा निर्धार संघटनेने केला होता. या आंदोलनाची धास्ती केंद्र आणि राज्य सरकारने घेतली. अखेर कोशारी यांचा राजीनामा घेऊन तो मंजूर करण्याची नामुष्की सरकारवर आली. हा ऐतिहासिक भूमिचा आणि पुरोगामी विचारांचा विजय असल्याचे काळे म्हणाले.