पुणे I झुंज न्यूज : पासपोर्ट काढताना पोलीस पडताळणीची (क्लिअरन्स सर्टिफिकेट) प्रक्रिया आता सोपी होणार आहे. आजपासून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सेवांसाठीचे अर्ज देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला असल्याची माहिती पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जून देवरे यांनी दिली आहे.
पासपोर्ट काढताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची प्रक्रिया किचकट वाटते. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सेवांसाठीचे अर्ज देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर उपलब्ध होणार असल्याने पासपोर्ट काढणे आता सोपे होणार आहे. परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी काम करत आहे, असे डॉ. देवरे यांनी सांगितले.
पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे काय?
पासपोर्ट धारकाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) जारी केले जाते. निवासी स्थिती, नोकरी किंवा दीर्घ कालावधीसाठी व्हिसा मिळवायचा असेल तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण टुरिस्ट व्हिसावर परदेशात जाण्यासाठी पीसीसीची आवश्यकता नसते. संबंधित पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र येथे पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र अर्ज सबमिट करण्यापूर्वी ऑनलाइन फॉर्म भरणे आणि अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. देवरे म्हणाले. तरी बाहेरून पासपोर्ट काढताना काळजी घ्यावी कारण पासपोर्ट काढण्यासाठी दुप्पट रक्कम आकारली जाते, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अंतर्गत ही सुविधा अहमदनगर, बीड, इचलकरंजी, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, पंढरपूर, पिंपरी चिंचवड, सांगली आणि सातारा येथील पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रांवर ही सुविधा मिळणार आहे.
पीसीसीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
१. सध्याच्या पत्त्याचा पुरावा
२. परदेशी नियोक्त्यासोबत रोजगार कराराची स्वयं-साक्षांकित प्रत
३. अधिकृत इंग्रजी भाषांतराच्या सात वैध व्हिसाची प्रत (व्हिसा इंग्रजीत नसल्यास)
४. ईसीआर/नॉन-ईसीआरची स्वयं-साक्षांकित छायाप्रत