नाशिक I झुंज न्यूज : नाशिक जिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या बदल्यांकरिता दिल्या जाणाऱ्या बोगस प्रमाणपत्राची व्याप्ती वाढतच चालली आहे. 21 पोलीसांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे आणि डॉ. किशोर श्रीनिवास यांच्या सह्या आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढत चालली असून सहभागी वैद्यकीय अधिकारी फरार आहेत. जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिल्याने जिल्हा रुग्णालय आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जिल्हा रुग्णालयातून पोलिस कर्मचाऱ्यांना गंभीर आजाराचे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची संख्या वाढत असल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या तपासात 21 पोलीस प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे आंतरजिल्हा बदली केल्याचे निष्पन्न झाले असून जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सह्या आहेत.
डॉ. निखिल सैदाणे, डॉ. किशोर श्रीनिवास यांच्या सह्या असलेले प्रमाणपत्र दिल्याचे दिसून येत असून बंद अवस्थेत असलेल्या रुग्णालयांचा नावाचाही कागदपत्रांमध्ये उल्लेख असल्याचे दिसून आले आहे.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याबाबत कठोर भूमिका घेत बोगस प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश केला असून या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
या प्रकरणात असलेल्या पोलीस दलातील आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.