लेखन : धीरज वाटेकर, चिपळूण
मो. ९८६०३६०९४८
काल सकाळी (२० सप्टेंबर) आमच्या पर्यावरण मंडळाच्या अध्यक्षांचा फोन आला. म्हणाले, एक दु:खद बातमी आहे. आपले साताऱ्याचे सहकारी डॉ. गौतम महादेव सावंत गेले. अध्यक्षांचे बोलणे आम्हाला खरे वाटेना. घटना समजताच सरांचा अमेरिकेतील मुलगा तातडीने साताऱ्याला यायला निघाला होता. जवळपास अठ्ठावीस तासांनी आज सकाळी अकरा वाजता तो घरी साताऱ्याला पोहोचला. त्याला पाहाताच मॅडमनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचं काळीज हेलावून गेला. अंत्यसंस्कारपूर्व त्रिशरण पंचशील बुद्धवंदना पठण करण्यात आली. अत्यंत भावनिक वातावरणात आम्ही साहेबांना निरोप दिला.
वन कायद्याचा अभ्यासक हरपल्याची जाणीव होताच आमचं मन एकदम भूतकाळात, २०१३ सालात गेलं. तेव्हा आम्ही स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या सूचनेवरून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या बैठकीसाठी श्रीगोंदा येथे निघालो होतो. पर्यावरण कामातील आमचे सहकारी विलास महाडिक सोबत होते. सायंकाळ झालेली पाहून रात्री ‘सातारा ते श्रीगोंदा’ प्रवास न करता साताऱ्याला मुक्काम करण्याचा सल्ला आम्हाला आबासाहेबांनी दिला होता. आबासाहेब नुसता सल्ला देऊन थांबले नव्हते त्यांनी साताऱ्यात आमची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एका वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून दिला होता, ते अधिकारी होते गौतम महादेव सावंत !
सावंत साहेब तेव्हा परळी (सज्जनगड) भागाचे परिमंडळ वन अधिकारी होते. त्यांनी आमचे २००८ साली प्रकाशित झालेले ‘चिपळूण तालुका पर्यटन’ पुस्तक वाचले होते. पहिल्याच भेटीत त्यांनी आम्हाला ते कार्यरत असलेल्या परळी (सज्जनगड) भागातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या ‘ठोसेघर’वर पुस्तक लेखन करण्याची सूचना केली. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे चेअरमन आप्पासाहेब चव्हाण, त्यांचे सहकारी दीपक कदम आदींशी आमचा परिचय करून दिला होता. दीडेक वर्षांच्या प्रयत्नानंतर हे पुस्तक प्रसिद्ध झालं. तेव्हा सावंत साहेबांची सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे बदली झाली होती. पुस्तकाच्या प्रकाशनालाही त्यांना उपस्थित राहाता आलं नाही. तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलेलं. पण त्यांनी त्याची कधीही विशेष चर्चा केली नाही. त्यांच्यामुळे आमचं ठोसेघर परिसराशी नातं तयार झालं.
२०१५ साली या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक ‘प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालय’ पुरस्कार मिळाला, तेव्हाही साहेबांना खूप आनंद झाला होता. सावंत साहेबांनी वन खात्यात अधिकारी म्हणून जीवनभर सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वर्गीय आबासाहेबांच्या सूचनेनुसार पर्यावरण मंडळाच्या कामात ‘सातारा जिल्हा अध्यक्ष’ म्हणून लक्ष घालायला सुरुवात केली होती. पुढील महिन्यात होणाऱ्या पर्यावरण मंडळाच्या शिर्डी पर्यावरण संमेलनाची तयारी सुरु असताना सावंत साहेब गेल्याची धक्कादायक बातमी ऐकावी लागली. सुरुवातीला कोरोना काळात गोरखनाथ शिंदे सर गेले. त्यानंतर गेल्यावर्षी वृक्षमित्र आबासाहेब मोरे आणि आता वर्षभरात गौतम सावंत साहेबांचे जाणे पर्यावरण मंडळाच्या आम्हा सर्वांसाठी धक्कादायक आहे.
त्यांचा पर्यावरणीय कायदा आणि नॅचरोपॅथीचा उत्तम अभ्यास होता. मागच्या जागतिक पर्यावरण दिनाला (५ जून २०२२) बारामती पर्यावरण अभ्यास दौऱ्यातील पर्यावरण परिषदेत सावंत साहेबांनी वन क्षेत्रातील अत्यंत मुलभूत विषयांवर मुद्देसूद चर्चा घडवून आणली होती. अलिकडे तीनेक महिन्यांपूर्वी शिर्डी परतताना पुण्याहून निघताना आम्ही साताऱ्यात त्यांची भेट घेतली होती, ती शेवटची ठरली. तेव्हाच्या गप्पांत त्यांनी आम्हाला ‘माणदेश’ फिरवण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या नजरेतील ‘माणदेश’ फिरायचा राहिल्याचं दु:ख आता आयुष्यभर सोबत राहिल.
गौतम सावंत साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !