पुणे I झुंज न्यूज : आंबेगाव तालुक्यात एक चित्तथरारक घटना घडली. एका बिबट्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केला. पण हा हल्ला परतावून लावण्यात धाडसी महिलेला यश आलंय. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथे ही घटना घडली. घराबाहेर असलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार केला आणि बिबट्याला परतावून लावलं. कलाबाई देविदास मते असं या धाडसी महिलेचं नाव आहे. या धाडसी महिलेचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
बिबट्याच्या हल्ला परतावून लावून ही महिला बचावली. मात्र या प्राणघातक हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या महिलेच्या डोक्याला टाके पडलेत. कलाबाई यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथील कलाबाई मते यांचे घर चव्हाणवस्ती येथे असून घराशेजारी वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यांची गाय ते चरण्यासाठी वन विभागाच्या शेजारी बांधत असतात. रात्री सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घाबरून जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली.
मते कुटुंबियांनी त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. उपचार घेऊन त्या घरी आल्या. पण त्यांचं डोकं दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
सदर घटनेची माहिती मिळताच, वनविभागाने वन परीक्षेत्राधिकारी पी. एस. रौंदळ यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. सोमवारी सकाळी पी.एस. रौंदळ, वनपाल एस.एल गायकवाड, वनरक्षक एस.बी वाजे, वनरक्षक ए. एस.होले, आर.सी शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या परिसरात बिबट्याचा वावरही आहे. आता वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान वनविभाग क्षेत्र, ऊस क्षेत्र परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. एकट्याने बाहेर पडू नये, आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.